पैसे आणि शेती विक्रीला पत्नीचा विरोध; संतापलेल्या पतीने घरातच चाकूने भोसकून केला निर्घृण खून.

भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांड्यावर थरार; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू, आरोपी पती ताब्यात
भडगाव | प्रतिनिधी
भडगाव : तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार आणि शेती विकण्यास विरोध केल्याच्या संतापातून पतीने पत्नीवर धारदार चाकूने सपासप वार करून तिचा निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेमुळे वसंतवाडी तांड्यासह संपूर्ण भडगाव तालुक्यात खळबळ उडाली असून, दारूच्या व्यसनामुळे आणखी एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम पतीलाल राठोड (वय ४०) हा दारूच्या आहारी गेला होता. रविवारी सकाळी त्याने पत्नी ललिता आत्माराम राठोड (वय ३६) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र ललिता यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याशिवाय आरोपी शेती विकण्याचा आग्रह धरत होता, परंतु पत्नीने त्यालाही विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या आत्मारामने घरातच धारदार चाकू उचलून पत्नीच्या पोटावर सलग वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या ललिता यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी पोलिसांची धाव ; फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून घटनास्थळ सील केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक पुरावे जप्त केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
आरोपीला तात्काळ अटक ; खुनाचा गुन्हा दाखल
मृत ललिता राठोड यांचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात आरोपी आत्माराम राठोड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार करीत आहेत.
दारूच्या व्यसनामुळे पुन्हा एक कुटुंब उद्ध्वस्त
वसंतवाडी तांड्यावर घडलेल्या या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूच्या व्यसनामुळे निर्माण होणारे कौटुंबिक वाद आता थेट जीवघेण्या घटनांमध्ये परिवर्तित होत असल्याची चिंताजनक बाब या घटनेतून पुन्हा समोर आली आहे. एका क्षणाच्या रागात पतीने पत्नीचा जीव घेतल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.



