Headlines

🛑 ब्रेकिंग: जळगावात महिलेवर चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न; पोलिसांनी आरोपीला सोडले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी): मोहाडी रस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीतील ‘बालाजी हाइट्स’ अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारी घडलेल्या धाडसी घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षक म्हणून पूर्वी काम केलेल्या व्यक्तीनेच त्या ओळखीचा गैरफायदा घेत महिला रहिवाशाच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न केला. या प्रसंगी महिलेने हिम्मत दाखवत स्वतःचा बचाव केला; मात्र झटापटीत त्या जखमी झाल्या. रहिवाशांनी तत्परतेने आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले, मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी आरोपीला अटक न करता नोटीस देऊन सोडून दिल्याचे समोर आले आहे.

जळगाव दरोडा : घटना कशी घडली

गोकुळ हंसराज राठोड (रा. सांगवी, ता. चाळीसगाव) असे आरोपीचे नाव असून, तो दीड वर्षांपूर्वी ‘बालाजी हाइट्स’ अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. त्यामुळे रहिवाशांशी त्याची ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजता तो अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या *आरोही इंद्रकुमार ललवाणी (वय ३८)* यांच्या घरी गेला. घरात प्रवेश मिळताच त्याने महिलेवर चाकूचा धाक दाखवत लुटीचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने धैर्य दाखवत प्रतिकार केला आणि आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

जळगाव दरोडा : पोलिसांनी अटक का केली नाही?

महिला जखमी असून, अनधिकृतपणे घरात शिरून लुटीचा प्रयत्न, तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे घडूनही आरोपीला पोलिसांनी अटक न करता फक्त ताकीद देऊन सोडले, ही माहिती सायंकाळी ठाणे अंमलदाराने ‘स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना दिली. या प्रकरणाबाबत रात्री सव्वा आठ वाजता संपर्क साधल्यावर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बबन आव्हाड यांनी “मला या घटनेची माहिती नाही, माहिती घेऊन सांगतो,” असे सांगितले. मात्र त्यानंतर त्यांनी वारंवार फोन करूनही प्रतिसाद दिला नाही.

जळगाव दरोडा : आरोपी ‘मेमो’च्या बहाण्याने पसार?

ठाणे अंमलदाराच्या माहितीनुसार आरोपी गोकुळ राठोडला ‘मेमो’ देऊन सोडण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा मेमो वैद्यकीय तपासणीसाठी देण्यात आला होता. मात्र तपासणीसाठी गेल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. आरोपी पसार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या भीतीने ही माहिती दडपली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जळगाव दरोडा : नागरिकांत संताप आणि पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्हे

अशा गंभीर गुन्ह्याच्या आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक न करणे आणि त्याला मुक्त सोडणे हे नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे. रहिवाशांत संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांनी नागरिकांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आरोपीला तातडीने अटक करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 ब्रेकिंग: सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते अमोल कोल्हे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

🛑 ब्रेकिंग: भडगावात निवडणुकीआधी मोठी राजकीय हालचाल; शिंदे सेनेचा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

🛑 ब्रेकिंग: जळगाव जिल्हा परिषद निवडणूक गट आरक्षणाची सोडत जाहीर, अनेक गट राखीव…

5,479Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION