कजगाव नदीपात्रालगत स्वच्छता मोहिमेला सुरुवात; जेसीबीच्या सहाय्याने कचरा व झाडाझुडपे हटविण्याचे काम सुरू.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर
कजगाव, दि. २६ ऑगस्ट २०२६ : कजगाव परिसरातील नदीपात्रालगत वाढलेले गवत, झाडाझुडपे, साचलेला कचरा तसेच माती व इतर अडथळे हटवून परिसर स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राच्या बाजूचा भाग साफ करण्याचे काम सध्या सुरू आहे.
नदीपात्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडाझुडपे आणि साचलेल्या कचऱ्यामुळे परिसर अस्वच्छ दिसत होता. त्यामुळे स्वच्छता व परिसर सुशोभीकरणाच्या दृष्टीने नदीपात्रालगतचा भाग मोकळा व स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कजगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नदीपात्रालगतच्या परिसरातील स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या साफसफाईमुळे परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे.
पावसाळ्याच्या काळात पाण्याच्या प्रवाहाला झाडाझुडपे, कचरा किंवा इतर अडथळ्यांमुळे अडचण निर्माण होऊ नये, यासाठीही या स्वच्छता मोहिमेला विशेष महत्त्व आहे.
दरम्यान, नागरिकांनी नदीपात्रात व परिसरात कचरा न टाकता स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.



