ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; देशभर तहसील कार्यालयांबाहेर आंदोलनाचा एल्गार.

भडगावात विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन ; विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा.
भडगाव, प्रतिनिधी : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, तसेच आगामी जनगणनेच्या प्रपत्रात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय पिछडावर्ग (ओबीसी) मोर्चाच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसांपासून देशभरातील तहसील कार्यालयांबाहेर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग भडगाव तालुक्यातही पोहोचली असून, ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

‘इतर’मध्ये नव्हे, स्वतंत्र नोंद हवी!
जनगणनेच्या प्रपत्रात ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद करण्याऐवजी त्यांना ‘इतर’ या सदरामध्ये टाकले जात असल्याने ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची अचूक आकडेवारी समोर येत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळण्यासाठी जातीनिहाय जनगणना होणे अत्यंत आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.
भडगाव येथील आंदोलनाचे प्रमुख प्रभारी विनोद अडकमोल असून, विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरील आंदोलन सुरू आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा
या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. लहुजी क्रांती मोर्चाचे भगवान शिंदे, राष्ट्रीय व्हीजेएनटीचे देविदास राठोड, जवाहर चव्हाण, भारत मुक्ती मोर्चाचे जाकीर कुरेशी, नागराज धुळे, अभिमान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून ओबीसींच्या मागणीला समर्थन दिले.
‘जनगणना नाही तर न्याय नाही’चा निर्धार
ओबीसी समाजाची खरी लोकसंख्या, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि प्रतिनिधित्व यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना होईपर्यंत देशाला सामाजिक न्यायाच्या दृष्टीने पूर्ण स्थैर्य मिळणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली.
देशभरातील सर्व तालुक्यांमध्ये एकाचवेळी सुरू असलेल्या या आंदोलनातून “ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे” असा बुलंद आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.




