⁠हॅलो क्राईम

कजगावात मेडिकलचे शटर उचकून चोरी ; ५ ते ६ हजारांची रोकड लंपास.

मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास घटना; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव.

कजगाव, ता. भडगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावता माळी चौकातील संजय कडू पाटील यांच्या मालकीच्या वैशाली मेडिकलचे शटर उचकून चोरट्यांनी मध्यरात्री मेडिकलमध्ये प्रवेश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ३० ऑगस्टच्या मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी मेडिकलमधील चिल्लर ठेवलेल्या वाट्याही चोरून नेल्या. त्यानंतर त्या वाट्या गावातीलच चौकातील एका बोळीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. तसेच मेडिकलमधील अंदाजे ५ ते ६ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

भरवस्तीत असलेल्या मेडिकलचे शटर उचकून चोरट्यांनी चोरी करण्यात यश मिळवल्याने कजगावच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही परिसरात चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, कजगाव येथील पोलीस मदत केंद्रात पोलिसांची संख्या वाढवून रात्रीची गस्त अधिक कडक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चोरीच्या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कजगावातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा कधी बसणार? रात्रीची पोलीस गस्त वाढणार का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती भडगाव पोलिसांना देण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button