💥 ब्रेकिंग : चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक घरात शिरले पाणी…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चाळीसगाव तालुका अक्षरशः तडाख्यात सापडला आहे. जोरदार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला असुन शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. तर काढणीस आलेल्या सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून हवालदिल परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, चाळीसगाव शहर व ग्रामीण भागात पावसाचा जोर अद्याप कायम असून डोंगरी व तितुर नदीला मोठा पूर आला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये धोका वाढल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून नागरिकांना रात्रीच सुरक्षित स्थळी हलवले.
शहरातील हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसराला पाण्याचा वेढा बसला आहे. याशिवाय शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे वीजवाहिन्यांवर ताण आल्याने शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुरस्थिती हाताळण्यासाठी चाळीसगाव नगरपरिषद व अग्निशमन दल सतत गस्त घालत असून रात्रीभर सायरन वाजवत नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही तास तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा..
💥 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात पाऊस सुरूच; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा



