जळगावमध्ये गुन्हेगारीचा वाढता आलेखः लग्नसोहळ्यासाठी गावी आलेल्या 23 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या.
हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून थेट शस्त्रांचा वापर करून जीव घेण्यापर्यंत मजल जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच जळगाव तालुक्यातील बोरनार गावात एका 23 वर्षीय तरुणाची धारदार चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आली. प्रेम धनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. गावातील लग्नसोहळ्यासाठी आलेल्या प्रेमचा काही जणांसोबत वाद झाला. त्यानंतर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. बुधवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अमळनेरमध्ये वास्तव्यास, दोन दिवसांपूर्वी गावी आला होता
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम धनगर हा अमळनेर येथे वास्तव्यास होता. त्याचे आई-वडील जळगाव तालुक्यातील बोरनार गावात राहतात. त्यामुळे प्रेम अधूनमधून गावी येत असे. दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी बोरनार येथे आला होता. बुधवारी गावात एका लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी प्रेमही उपस्थित राहिला होता. मात्र, लग्नाचा आनंद सुरू असतानाच एका वादामुळे परिस्थिती गंभीर बनली.
वादाचे रूपांतर हाणामारीत; चाकूने सपासप वार
लग्नसोहळ्याच्या ठिकाणी प्रेमचा काही व्यक्तींसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. याचदरम्यान अज्ञात हल्लेखोराने प्रेमवर धारदार चाकूने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. चाकूचे वार गंभीर असल्याने प्रेम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. लग्नासाठी गावी आलेल्या तरुणाचा अशा प्रकारे अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; मृतदेह रुग्णालयात
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने बोरनार येथे दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर प्रेमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी हल्लेखोर कोण होते, वाद नेमका कशामुळे झाला आणि हत्येमागे पूर्ववैमनस्य होते की अचानक झालेल्या वादातून हा प्रकार घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.
आई-वडिलांचा आक्रोश; गावात शोककळा
प्रेमच्या हत्येची बातमी त्याच्या आई-वडिलांना समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. काही दिवसांपूर्वीच घरी आलेल्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गावातील नागरिकही वादाचे कारण किंवा हल्लेखोरांबाबत उघडपणे माहिती देण्यास पुढे येत नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.
तरुणांमध्ये शस्त्रांचा वापर वाढतोय; पोलिसांसमोर आव्हान
जळगाव जिल्ह्यात किरकोळ कारणांवरून होणारे वाद, मारहाण आणि हत्यांच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. तरुणांमध्ये गावठी कट्टे, चाकू आणि इतर धारदार शस्त्रे बाळगण्याचे प्रकार चिंताजनक ठरत आहेत. क्षुल्लक वादातून शस्त्रे बाहेर काढून हल्ले करण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अधिक कठोर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. बोरनार येथील प्रेम धनगर हत्या प्रकरणात आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करणे, तसेच हत्येमागील नेमके कारण शोधणे, हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.



