दुष्काळ जाहीर ; आता पंचनामे आणि मदतीच्या अंमलबजावणीची परीक्षा !
जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुके दुष्काळी; बांधावरची पाहणी झाली, आता नुकसान नोंदणी आणि प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा

जळगांव : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू केला आहे. यामध्ये जळगांव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश आहे. एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल हे तालुके दुष्काळी यादीत आहेत.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता प्रशासनासमोर पीक नुकसानीचे पंचनामे, सर्वेक्षण आणि नुकसानग्रस्त क्षेत्राची अचूक नोंद करण्याचे आव्हान आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून पंचनाम्याची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस लोकेशनसह माहिती संकलित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
बांधावर पाहणी ; शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष मदतीची आस
दुष्काळी परिस्थितीची तीव्रता जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून विविध भागांतील शेतशिवारांची पाहणी केली जात आहे. पिकांची सद्यस्थिती, पावसाची तूट आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ही पाहणी महत्त्वाची असली, तरी पाहणीनंतरची प्रशासकीय कार्यवाही अधिक निर्णायक ठरणार आहे.
पंचनामे वेळेत पूर्ण होणे, नुकसानग्रस्त पिकांची अचूक नोंद होणे, पात्र लाभार्थी निश्चित होणे आणि शासनाच्या विविध सवलती व मदत योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, हे पुढील महत्त्वाचे टप्पे आहेत.
१२ उपाययोजनांचा आधार ; आर्थिक मदतीचा स्वतंत्र निर्णय कधी?
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांसाठी जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, रोजगार हमीच्या कामांच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा, चारा व अन्नधान्याची व्यवस्था अशा विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
मात्र, पीक नुकसानीच्या आधारे मिळणाऱ्या प्रत्यक्ष आर्थिक मदतीसाठी पंचनामे व नुकसान मूल्यांकनाची प्रक्रिया महत्त्वाची आहे. उपलब्ध माहितीनुसार पीक नुकसानीच्या आर्थिक मदतीबाबत स्वतंत्र निर्णयाची प्रक्रिया अपेक्षित आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पंचनाम्यात पारदर्शकता हवी
नुकसान नोंदविताना प्रत्यक्ष शेतशिवाराची पाहणी, पिकाचे क्षेत्र, नुकसानीचे प्रमाण, छायाचित्रे, जीपीएस नोंद तसेच संबंधित कागदपत्रांची अचूक नोंद होणे आवश्यक आहे. पंचनाम्यातील त्रुटींमुळे पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
घोषणांपासून प्रत्यक्ष लाभापर्यंत…
पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दुष्काळ जाहीर होणे हा दिलासा देणारा निर्णय असला, तरी कागदावरील घोषणा आणि शेतकऱ्याच्या खात्यातील प्रत्यक्ष मदत यामधील अंतर कमी करण्याची खरी परीक्षा आता प्रशासनाची आहे.
पाहणी झाली; आता पंचनामे, नुकसान नोंदणी, निर्णय आणि प्रत्यक्ष मदतीच्या अंमलबजावणीकडे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुके दुष्काळी
एरंडोल | पारोळा | धरणगाव | चोपडा | पाचोरा | जामनेर | जळगाव | भडगाव | अमळनेर | रावेर | चाळीसगाव | भुसावळ | बोदवड | मुक्ताईनगर | यावल



