जिल्हा बँक निवडणूक: जळगाव जिल्हा बँकेच्या जागावाटपाचा तिढा कायम; अजिंठा विश्रामगृहातील बैठकीतही तोडगा नाही!
मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपड्याच्या जागांवरून महायुतीत मतभेद

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असून, सोमवारी अजिंठा विश्रामगृहात झालेल्या महायुतीच्या महत्त्वपूर्ण बैठकीतही अपेक्षित तोडगा निघू शकला नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येक घटक पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, विशेषतः मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपडा या मतदारसंघांतील जागांवरून घटक पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे महायुतीसमोर जागावाटपाचे मोठे आव्हान कायम असल्याचे स्पष्ट झाले
या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाने उमेदवार द्यायचा, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हा बँक निवडणूक : मुक्ताईनगर, बोदवड, चोपड्यात पेच कायम
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही मतदारसंघांवर एकापेक्षा अधिक घटक पक्षांनी दावा केल्याने जागावाटपाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे. विशेषतः मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपडा या तीन मतदारसंघांतील जागांवरून महायुतीतील नेत्यांमध्ये एकमत झालेले नाही. या जागांचा तिढा सोडविण्यासाठी नेत्यांनी बराच वेळ चर्चा केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतरही अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
जिल्हा बँक निवडणूक: गिरीश महाजन म्हणाले, मंगळवारी लसकाळपर्यंत तोडगा काढू!
बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जागावाटपातील अडचणी मान्य केल्या. मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपडा येथील जागांवरून चर्चा सुरू असून, काही ठिकाणी घटक पक्षांमध्ये सहमती होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मंगळवारी सकाळपर्यंत जागावाटपाचा हा तिढा सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुतीतील सर्व घटक पक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भूमिका महाजन यांनी मांडली.
जिल्हा बँक निवडणूक : महायुतीच्या अंतिम निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष
जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीतील सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे जागावाटप करताना कोणत्याही घटक पक्षाची नाराजी होऊ नये, याची काळजी नेत्यांना घ्यावी लागत आहे. मात्र, तीन महत्त्वाच्या मतदारसंघांतील जागांवरून निर्माण झालेला पेच अद्याप कायम आहे
आता मंगळवारी सकाळपर्यंत महायुतीचे नेते कोणता निर्णय घेतात, कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणत्या जागा येतात आणि कोणाला माघार घ्यावी लागते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जागावाटपाचा तिढा सुटतो की महायुतीतील अंतर्गत मतभेद आणखी वाढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
धरणगावमध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर; गुलाबराव पाटलांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र




