हॅलो राजकारण

धरणगावमध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर; गुलाबराव पाटलांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

१५ नगरसेवक निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार; पराभवातून धडा घेत नव्या जोमाने कामाला लागा – शहर विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

धरणगाव शहरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्यासाठी पक्षाकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात पक्षाची मजबूत फळी उभी करून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असून, भविष्यातही ही ओळख कायम ठेवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धरणगाव येथील डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना कार्यालयात शहराच्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने शिवसेनेच्या १५ नगरसेवकांना निवडून दिले; मात्र नगराध्यक्षपद थोड्या मतांनी हुकले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश न होता निवडणुकीतील चुका तपासून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे. पराभवातून शिकून संघटना अधिक मजबूत करणे हीच खरी राजकीय वाटचाल असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पद म्हणजे जनसेवेची जबाबदारी

पदाधिकाऱ्यांनी केवळ पदाचा मान न मिरवता जनतेची कामे करण्याला प्राधान्य द्यावे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारधारेनुसार काम करावे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेत प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात राहावे. तसेच ज्येष्ठ व अनुभवी शिवसैनिकांचे मार्गदर्शन घेऊन दर महिन्याला संघटनात्मक बैठका घ्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

धरणगाव शहराच्या विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा. जळगाव व धरणगाव तालुक्यातील उर्वरित नाला खोलीकरणाची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प असून, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतापराव पाटील यांचे संघटनात्मक कामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. प्रभागनिहाय नियुक्त्या, नियमित बैठका आणि जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक फळी मजबूत करावी. पदाधिकाऱ्यांसाठी लवकरच प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनीही पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

उपशहरप्रमुखपदी कमलेश भगवान बोरसे, सुरेश भास्कर महाजन, संतोष वाल्मीक महाजन आणि अहेमद नबुवतखां पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. शहर संघटकपदी प्रभुदास रोहीदास जाधव, उपशहर संघटकपदी गोविंदा सुनील मनोरे व किशोर साहेबराव पाटील, शहर कार्याध्यक्षपदी रवींद्र रमेश महाजन, उपकार्याध्यक्षपदी सुदर्शन सुरेश भागवत, शहर समन्वयकपदी नाना लोटन मराठे आणि उपशहर समन्वयकपदी हेमराज चौधरी यांची निवड झाली. युवासेनेच्या शहरप्रमुखपदी कन्हैया महाजन यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, प्रतापराव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, जळगाव महानगरप्रमुख गणेश सोनवणे, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, शहरप्रमुख वीरेंद्र पुरभे, उपनगराध्यक्ष विजय महाजन, गटनेते पप्पू भावे, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, ॲड. शरद माळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button