भडगाव क्रिकेट अकॅडमीचा समर कॅम्प विविध उपक्रमांनी यशस्वी.
कॅम्पच्या प्रारंभी खेळाडूंना फिटनेस प्रशिक्षण, क्रिकेट सराव तसेच क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले. त्यानंतर योगा, प्राणायाम आणि मड थेरपीची विशेष सत्रे घेण्यात आली.
भडगाव क्रिकेट अकॅडमीतर्फे सामाजिक भान जपून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि भडगाव शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यातून इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्याच सोबत भडगाव शहरात जनगणना जनजागृती साठी पायी रॅली काढून नागरिकांना जनगणनेप्रती जागरूक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगीत विषयावरील विशेष सत्र आयोजित करण्यात आले. फिटनेस व व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस कर्मचारी हरीश परदेशी व उमेश भोई यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच योगेश शिंपी सरांच्या मदतीने सामान्य ज्ञान (जनरल नॉलेज) चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या संगीत क्षेत्रातील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रशांत सोळंके आणि नीरज खैरनार यांची विशेष सत्रे घेण्यात आली.
१ जून रोजी खेळाडूंसाठी डीएम वॉटरपार्क येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये खेळाडूंनी विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेतला. संपूर्ण महिनाभर चाललेल्या या कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या क्रिकेट कौशल्यात वाढ झालीच, शिवाय त्यांच्यात सामाजिक जाणीव, शिस्त, आरोग्याविषयी जागरूकता आणि आत्मविश्वासही विकसित झाला.
२ जून रोजी क्रिकेट समर कॅम्पचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास पाचोरा शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय वाघ, विनय जकातदार, विजय देशपांडे, डॉ. विजय देशमुख, डॉ. प्रमोददादा पाटील, डॉ. निलेशदादा पाटील, हाजी झाकिर कुरेशी, सौरभभाऊ पाटील, प्राचार्य डॉ. गायकवाड सर, पत्रकार संजय पवार, प्रा. दीपक मराठे सर, प्रा. अतुल देशमुख, योगेश शिंपी सर तसेच मोठ्या संख्येने पालक आणि महाविद्यालयाचे माजी खेळाडू पीएसआय योगेश जाधव, जळगाव पोलीस दलातील विलास शिंपी व रविआबा येवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रा. डॉ. दिनेश तांदळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भडगाव क्रिकेट अकॅडमीचे संचालक रवींद्र वाडेकर यांच्या अथक परिश्रमातून हा समर कॅम्प यशस्वीरित्या पार पडला. कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी परीक्षित पाटील, चेतन खैरनार, प्रशांत सोळंखे आणि नीरज खैरनार यांचेही मोलाचे योगदान लाभले.
संपूर्ण महिनाभर राबविण्यात आलेल्या विविध क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे सहभागी खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. या उपक्रमाबद्दल अकॅडमीचे पदाधिकारी, प्रशिक्षक, पालक आणि सहभागी खेळाडू यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




