भडगाव तालुक्यातील कजगाव येथे गोळीबाराच्या घटनेने खळबळ; आरोपींचा शोध सुरू
जळगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे २२ वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कजगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तरुणावर गोळीबार करण्यात आला असून घटनास्थळी तीन राउंड फायर केल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आल्याचे समजते.
हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे कजगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
