ब्रेकिंग : भडगाव वाळू माफिया कारवाई : महसूल विभागाची व्हॉटअप वर प्रेस नोट, कारवाई संदर्भात संभ्रम…

भडगाव (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे वाक शिवारात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात भडगाव महसूल प्रशासनाने गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी धडक कारवाई केली. तहसीलदार शीतल सोलाट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी ८ वाजता अचानक छापा टाकत वाळू वाहतुकीशी संबंधित ७ डंपर, २ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर अशी एकूण १२ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे परिसरातील वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात वाहने जमा
वाक शिवारात विनापरवाना वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. छाप्यादरम्यान ताब्यात घेतलेली सर्व १२ वाहने भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली आहेत. संबंधित वाहनमालक आणि चालकांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
कारवाईबाबत भडगाव शहरात उलटसुलट चर्चा, फक्त छोटे मासे गळाला
महसूल प्रशासनाच्या या कारवाईचे वृत्त समोर आल्यानंतर भडगाव परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या कारवाईत केवळ काही वाहने ताब्यात घेण्यात आली असून, अवैध वाळू व्यवसायातील कथित मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई झाली का, असा प्रश्न काही स्तरांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या कारवाईची व्याप्ती, त्यामागील संपूर्ण साखळी आणि संबंधितांवर होणारी पुढील कारवाई याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.




