जलजीवन योजनेच्या अपूर्ण व निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्याचे उपोषण.

कजगाव ग्रामपंचायतीचे सदस्य पुंडलिक सोनवणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास
हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव
कजगाव : ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पुंडलिक मधुकर सोनवणे यांनी गावातील जलजीवन मिशन योजनेच्या अपूर्ण कामासह कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित कामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपोषणास सुरुवात केली.
कजगाव येथील जलजीवन योजनेचे काम अपूर्ण असून, झालेल्या कामाच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून शासनाच्या निधीचा योग्य विनियोग झाला आहे की नाही, याची तपासणी करावी, तसेच दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
गावातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि जलजीवन योजनेचे काम पूर्णत्वास जावे, यासाठी आपण प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
दरम्यान, गावातील सार्वजनिक प्रश्नांसाठी आवाज उठविणाऱ्या व्यक्तीच्या मागण्यांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडूनही करण्यात येत आहे. सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर मतभेद असले तरी संबंधित प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
जलजीवन योजनेच्या कामाची तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून अहवाल जाहीर करावा आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गावासाठी आवाज उठवणाऱ्याचा आवाज दाबण्याऐवजी त्याच्या प्रश्नांची प्रशासनाने दखल घेऊन सत्य समोर आणावे,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण शिवाजी बोरसे यांनी व्यक्त केली आहे.
उपोषणाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.




