पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी रोहन घुगे

यावेळी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पुरवठा विभाग तसेच Indian Oil Corporation, Bharat Petroleum, Hindustan Petroleum, Nayara Energy आणि Reliance Industries या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील इंधन साठ्याचा आढावा घेतला.

गेल्या चार दिवसांच्या तुलनेत एका दिवसातच मोठ्या प्रमाणावर डिझेलची विक्री होत असल्याने काही ठिकाणी पुरवठ्यावर ताण जाणवत असल्याचे प्रशासनाने नमूद केले. मात्र जिल्ह्यातील उपलब्ध साठा व येणारा पुरवठा लक्षात घेता नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनी पॅनिक बायिंग करू नये, खुल्या कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल घेऊन जाणे टाळावे तसेच अत्यावश्यक परिस्थितीतच सुरक्षित कंटेनरचा वापर करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क असून सर्व पेट्रोल पंपांवर महसूल, पुरवठा व पोलीस विभागाकडून नियमित गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लावणीच्या हंगामामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेबाबत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी आवश्यक तेवढे पेट्रोल-डिझेल पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असून अतिरिक्त साठा करण्याची गरज नाही. गरजेनुसार पुरवठा सुरळीत सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



