भडगावात मान्सूनपूर्व नाले सफाई अभियानाला वेग.
सुरुवातीला बाळद रोड परिसरातील ड्रेनेज सफाई हाती घेण्यात आली असून जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा काढण्यात येत आहे. मागील वर्षातील पावसाळ्यात नागरिकांना आलेला अनुभव व अडचणी लक्षात घेऊन यंदा नगरपरिषदेकडून सर्व प्रमुख नाले आणि पाण्याचा विसर्ग होणाऱ्या मार्गांची व्यापक साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३ जूनपर्यंत शहरभर व्यापक स्वच्छता मोहीम

सदर अभियान लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, आरोग्य सभापती इम्रान अली सय्यद यांच्या सहकार्याने विविध प्रभागांतील लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागासोबत समन्वय साधला आहे. प्रभाग क्र. ८ मधील नगरसेविका समीक्षाताई पाटील व नगरसेवक अमोल पाटील, प्रभाग ९ मधील नगरसेविका वैशालीताई पाटील व नगरसेवक विजयकुमार भोसले, तसेच प्रभाग १० मधील नगरसेविका ज्योतीताई पाटील यांनी शहरातील समस्याग्रस्त भागांचा आढावा घेऊन सफाई आराखडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.
भडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता. सत्यम पाटील, श्रीमती निशा लोट व क्लार्क छोटू वैद्य यांनी प्रभागनिहाय नियोजन करून तात्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. उर्वरित प्रभागांमध्येही लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे.
विशेष म्हणजे शहरातील मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होणारे कोल्हा नाला, ग्रीन पार्क नाला, टोणगाव नाला, यशवंत नगर नाला तसेच शिवनेरी गेट परिसरातील नाल्यांचीही व्यापक साफसफाई करण्यात येणार आहे. या मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रभावी उपाययोजना सुरू नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.




