हॅलो जनता न्यूज, रावेर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रावेर शहरातील तसेच तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १०८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. ही माहिती रावेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी दिली.
अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावेरमध्ये दरवर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन सतर्कतेचा उपाययोजना राबवित असते. यावर्षी देखील त्याच धर्तीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांना ओळखून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यावर शिक्कामोर्तब करत प्रांताधिकाऱ्यांनी १०८ जणांना शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.
या कारवाईसाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील व विशाल यांनी विशेष मोहीम हाती घेतली. संशयित व्यक्तींना नोटीस बजावून कायदा व सुव्यवस्था भंग करण्यास वाव मिळणार नाही, यासाठी दक्षता घेतली गेली. पोलिस प्रशासनाच्या या पावलामुळे नवरात्रोत्सवातील विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे रावेर शहरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, उत्सव काळात कोणत्याही अप्रिय घटनेला आळा बसण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : प्रांजल खेवलकर प्रकरणात खडसेंचे पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले…
🚨 ब्रेकिंग : पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला जळगाव रेल्वे स्थानकाजवळ लागली आग
🚨 ब्रेकिंग : चाळीसगाव अपघात, इको-आयशरची समोरासमोर जोरदार धडक, आठ भाविक जण जखमी
