हॅलो जनता न्यूज, भडगाव (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. या निवडणुकांमध्ये भडगाव नगरपालिकेवर भगवा फडकवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या या तयारीचा एक भाग म्हणून आज भडगाव येथे भव्य परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा आज लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता होणार असून, या मेळाव्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आणि आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असले, तरी भडगाव तालुक्यातील पक्षातील गटबाजी ही एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. काही माजी पदाधिकारी आणि स्थानिक नेते वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेल्याने आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर आजचा परिवर्तन मेळावा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. पक्षाच्या जिल्हास्तरीय नेतृत्वापुढे सर्व गटांना एकत्र आणण्याचे आणि पक्षात एकी निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. मेळाव्यात या विषयावर वरिष्ठ नेते कोणता तोडगा काढतात, आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भडगाव नगरपालिकेवरील सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून सध्या रणनिती आखण्यात येत असून, या मेळाव्यात आगामी निवडणुकीसाठी घोषणापत्राची प्राथमिक दिशा, संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि प्रचार आराखडा यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. भडगाव शहर व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक या मेळाव्याला उपस्थित राहणार असून, हा मेळावा भाजपच्या एकीचा आणि ताकदीचा प्रदर्शन ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
🔴ब्रेकिंग : भडगावात भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा : विविध पक्षाच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव रेल्वे स्टेशन येथे विद्यार्थी दिन उत्साहात साजरा
