बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींच्या वाढीव मोबदल्याचा दावा; जळगावातील दोन वकील अटकेत.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव
बनावट कागदपत्रांच्या आधारे भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याप्रकरणी जळगावातील दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. ॲड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड, जळगाव) आणि ॲड. प्रशांत नाना बाविस्कर (रा. पाळधी, ता. जामनेर) अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने न्यायालयात तब्बल ६३ कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आला होता.
मात्र, या दाव्यासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि इतर बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले.
त्यापैकी ॲड. किशोर पाटील यांच्याविरुद्ध १७ तर ॲड. प्रशांत बाविस्कर यांच्याविरुद्ध ३ गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, दोन्ही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर २४ जुलै रोजी दोघांना वेगवेगळ्या दोन गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करीत असून, या घोटाळ्यात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.




