बदामी (कर्नाटक) येथे राष्ट्रीय महासंमेलन उत्साहात संपन्न
भडगाव : बदामी (कर्नाटक) येथे राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठान, भारत यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय महासंमेलन दिनांक २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले. देशभरातून मोठ्या संख्येने बांधव, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.
या महासंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत सरदार मा. सत्यजित दादा पाटणकर होते, तर उद्घाटक म्हणून मा. दीपक आबा साळुंखे (माजी आमदार, सांगोला) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. यशपालजी सोलंकी (डायरेक्टर, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) यांनी उपस्थितांना प्रेरणादायी विचार दिले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून पैलवान धनाजी फडतरे, पैलवान मनीष मान, सौ. संगीता साळुंखे (माई), तसेच श्रुतीताई पुंगावकर यांनी आपली उपस्थिती नोंदवली. चालुक्य इतिहासाचे अभ्यासक डॉ. के. एम. सुरेश व डॉ. ई. नागमणी यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन प्रा. शिवाजी आप्पा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. विविध सत्रांमधून चालुक्य इतिहास, सामाजिक एकता, युवकांचे संघटन व भविष्यकालीन दिशा यांवर सखोल चर्चा करण्यात आली. पहिल्या सत्रात सकाळपासून नोंदणी, स्नेहभोजन व उद्घाटन समारंभ पार पडला, तर दुसऱ्या सत्रात सायंकाळी राष्ट्रीय महासंमेलनाचा मुख्य कार्यक्रम पार पडून उपस्थितांना एकत्रित करण्याचा संदेश देण्यात आला.
महासंमेलनाच्या निमित्ताने चालुक्य समाजाचे राष्ट्रीय पातळीवर एक मजबूत संघटन उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. एकूणच, बदामी येथे पार पडलेले हे राष्ट्रीय महासंमेलन ऐतिहासिक, प्रेरणादायी व यशस्वी ठरले.



