अभिलाषा रोकडे यांची तक्रार समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून निवड.

नगरदेवळा, ता. पाचोरा : राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणुकीच्या तक्रारींच्या चौकशीसाठी कार्यरत असलेल्या अंतर्गत व स्थानिक समित्यांवरील अशासकीय सदस्यांची सुधारित जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील अभिलाषा आशा रोकडे यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ अंतर्गत प्रत्येक कार्यालय, संस्था व आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये ही समिती बंधनकारक असून, त्यामध्ये अशासकीय सदस्याचा समावेश आवश्यक आहे. तसेच दहा पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांतील महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी स्थानिक समित्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांची जिल्हानिहाय यादी कालबाह्य झाल्याने राज्य शासनाने सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. समित्यांमध्ये अनुभवी सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवून तक्रार निवारण प्रक्रिया अधिक प्रभावी, निष्पक्ष, सुलभ व पारदर्शक करण्याचा उद्देश शासनाने व्यक्त केला आहे.
या संदर्भातील शासन परिपत्रक २० जुलै रोजी निर्गमित करण्यात आले असून, राज्यातील सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुखांना सुधारित यादीनुसार समित्यांचे कामकाज प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नगरदेवळा येथील अभिलाषा रोकडे यांच्या निवडीमुळे परिसरातून त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांच्या अनुभवाचा समितीच्या कामकाजात निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




