न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंडवरील बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करा ; युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश शेलार यांची नगर परिषदेकडे मागणी.

भडगाव : शहरातील सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय (न्यु इंग्लिश स्कूल) मैदानावरील मुख्य स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे भडगाव शहराध्यक्ष योगेश शांताराम शेलार यांनी भडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इंग्लिश स्कूल मैदानावर दररोज पहाटे व सायंकाळी पोलीस भरती, सैन्य भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी शारीरिक सराव करणारे अनेक युवक-युवती विद्यार्थी नियमित येतात. मात्र, मैदानावरील मुख्य स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे त्यांना अंधारातच धावण्याचा व सराव करण्याचा धोका पत्करावा लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून त्यांच्या सरावावरही प्रतिकूल परिणाम होत आहे.
याशिवाय, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सकाळी व सायंकाळी या मैदानावर फिरण्यासाठी येतात. अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बंद स्ट्रीट लाईट सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नगर परिषद प्रशासनाने खेळाडू, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन त्वरित सकारात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षाही योगेश शेलार यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस प्रवीण पाटील तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.




