⁠हॅलो क्राईम

बनावट शालार्थ आयडी प्रकरणात जळगावातील संस्थाचालक संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात.

नाशिक : बनावट शालार्थ आयडी आणि बोगस वैयक्तिक मान्यता प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) सोमवारी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरूड यांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील ते सहावे संशयित असून, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या प्रकरणात यापूर्वी जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती समोर आली. तपासानुसार, त्यांनी २८ ऑगस्ट २०११ ते ३ जून २०१५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना विविध शाळांतील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कथित बनावट वैयक्तिक मान्यता दिली. या मान्यतांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा संशय असून, संबंधित आदेश बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे.

एसआयटीच्या तपासात नाशिक विभागातील एकूण ८४१ संशयित शालार्थ आयडींपैकी ६३८ आयडी जळगाव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तपासाचे केंद्रबिंदू जळगाव जिल्हा ठरत असून, अनेक शैक्षणिक संस्थांच्या नोंदींची छाननी सुरू आहे.

सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने परजिल्ह्यात कारवाई करत संजय गरूड यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती नाशिक विभागातील अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी या प्रकरणात माजी शिक्षण उपसंचालकालाही अटक करण्यात आली होती. आता काही माजी शिक्षणाधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्याही भूमिकेची चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button