बनावट लेटरहेड प्रकरणात ॲड. विजय पाटील अटकेत.

जळगाव : जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या नावाने कथित बनावट लेटरहेड आणि शिक्क्यांचा वापर करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह विविध शासकीय कार्यालयांना कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी ॲड. विजय भास्कर पाटील यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.
या प्रकरणी संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, सन २०२३ ते २०२७ या कार्यकाळासाठी निवडून आलेल्या विद्यमान कार्यकारी मंडळाच्या अधिकारांबाबतची बाब धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असतानाही, स्वतःला संस्थेचे पदाधिकारी असल्याचे भासवून बनावट लेटरहेड, शिक्के आणि कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यांचा वापर करून विविध शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, ८ मार्च २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मागासवर्ग कक्षालाही अशाच स्वरूपाची कागदपत्रे पाठविण्यात आली होती. संबंधित कागदपत्रांची प्रत इतर शासकीय कार्यालयांनाही पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.



