चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; ७ किलोहून अधिक गांजासह तिघे जेरबंद.

चोपडा ( प्रतिनिधी ) : अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी प्रभावी कारवाई करत सुमारे ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, गांजासह वाहन, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ जुलै रोजी मध्यरात्री लासूर–हातेड मार्गावरील हातेड शिवारातील पाटचारी परिसरात संशयित वाहनावर सापळा रचण्यात आला. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये लपवून ठेवलेला १ लाख ७७ हजार ९०० रुपये किमतीचा ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला.
याप्रकरणी पोलिसांनी विष्णू सुभाष सुळ (रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे आणि प्रशांत ताराचंद अथाणी (दोघे रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान गांजासह ३ लाख रुपये किमतीची हुंडाई सॅन्ट्रो कार, ९० हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी आणि ४१ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमागील इतर आरोपी किंवा साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




