कजगांव येथे पारंपरिक कुस्तीची दंगल उत्साहात.

मल्लांच्या दमदार डावपेचांना कुस्तीप्रेमींची उत्स्फूर्त दाद ; मैदानावर रंगला मातीतील कुस्तीचा थरार
हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव
कजगांव : कजगांव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक कुस्तीची दंगल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या कुस्तीच्या मैदानात कजगावसह परिसरातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या अनेक मल्लांनी सहभाग घेत आपल्या दमदार डावपेचांचे प्रदर्शन केले.

कुस्तीची दंगल पाहण्यासाठी नागरिकांसह कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मैदानाभोवती प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती. आखाड्यात मल्लांनी एकमेकांना चितपट करण्यासाठी विविध डावपेच लढविल्याने प्रत्येक कुस्तीला रंगत आली. मल्लांच्या ताकदीच्या डावांना आणि चपळ हालचालींना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
मातीच्या आखाड्यात रंगलेल्या पारंपरिक कुस्तीमुळे जुन्या काळातील मल्लविद्येच्या आठवणींना उजाळा मिळाला. कुस्तीच्या प्रत्येक डावाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले होते. मल्लांचा जोश, प्रेक्षकांचा उत्साह आणि टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कुस्ती स्पर्धेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कजगावची पारंपरिक कुस्तीची दंगल ही केवळ मनोरंजनाचा भाग नसून ग्रामीण भागातील मल्लविद्या, शारीरिक संस्कार आणि पारंपरिक क्रीडा संस्कृती जपणारी महत्त्वाची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दंगलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कजगाव परिसरातील कुस्तीप्रेमींची आखाड्याशी असलेली नाळ आजही कायम असल्याचे दिसून आले.




