🛑ब्रेकिंग: टोणगाव शिवारातील वृक्षतोडीवर कादिर खान यांचा खुलासा, “सर्व परवानग्या कायदेशीरपणे घेतल्या”

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) — भडगाव शहरातील टोणगाव शिवारात गट क्रमांक ५६१/१ मध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाने गेल्या काही दिवसांत मोठा वाद निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर भडगावचे उद्योजक कादिर खान हाजी जोरावर खान यांनी आज सुंदरबन फार्म, भडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
कादिर खान यांनी सांगितले की, “गट क्रमांक ५६१/१ मधील वृक्षतोड ही कोणतीही बेकायदेशीर नाही. आम्ही भडगाव नगरपरिषद तसेच वन विभागाकडून सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत.” तक्रारदार सलीम सखावत खान यांनी भडगाव तहसीलदारांकडे दिलेल्या तक्रारीत “२०० ते ३०० झाडे तोडल्याचा” आरोप केला असला, तरी प्रत्यक्ष ठिकाणी केवळ १४ ते १५ झाडेच अस्तित्वात होती, असा दावा कादिर खान यांनी केला.
या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी सरिता पाटील, वनपाल नंदू पाटील, तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी आणि त्यांचे पथक प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून पाहणी केली असून अधिकृत पंचनामा तयार करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक परवाना देखील अधिकृतपणे घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
कादिर खान यांनी पुढे म्हटले की, “तक्रारदाराने कोणतीही योग्य चौकशी न करता केवळ मानसिक त्रास देण्यासाठी ही तक्रार दाखल केली आहे.” तसेच “अशा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या तक्रारी करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला हाजी जाकीर कुरेशी आणि बब्बू सेठ उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
महिंदळे येथील सुदाम परदेशी यांची नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
🛑ब्रेकिंग: कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी वाईट बातमी, कापसाच्या भावात ४.२६ टक्क्यांनी घसरण




