Headlines

महिंदळे ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील

भडगाव : तालुक्यातील महिंदळे गावातील विविध विकास कामांमधील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय उपोषण आंदोलन केले. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी, बसस्टॉप परिसरात बसविण्यात आलेल्या ॲक्वा यंत्रणेची तपासणी तसेच शेत पाणंद रस्त्यांच्या कामांबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सन २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत गावात पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गावात आजही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला. अंदाजपत्रकानुसार काम न होता केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखविण्यात आल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली.

तसेच बसस्टॉप परिसरात बसविण्यात आलेली अॅक्वा यंत्रणा स्थापनेपासूनच बंद अवस्थेत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना त्याचा कोणताही लाभ मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उलट बसण्याची सोय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हात-पावसात उभे राहावे लागत असल्याची समस्या त्यांनी मांडली.

शेत पाणंद रस्त्यांची कामे मंजूर असूनही प्रत्यक्षात कामे न झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यास तसेच माल वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. शासनाकडून निधी मंजूर होऊनही विकासकामे पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या सर्व प्रकरणांची सक्षम अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, निकृष्ट कामांची रक्कम वसूल करावी व संबंधित जबाबदार पदाधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी ठाम मागणी उपोषणकर्त्यांनी केली.

उपोषण आंदोलन सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत पार पडले. फकीरा सिताराम पाटील, सुनील फकीरा पाटील, देविदास दौलत पाटील, डॉ. पृथ्वीराज पाटील, रामदास शिवदास पाटील, पितांबर रामभाऊ पाटील, भिकन नरसींग पाटील, दिलीप अंबादाससिंग पाटील, साहेबराव मोतीलाल पाटील, सुधाकर अण्णा पाटील, उत्तम शामराव पाटील, रावसाहेब बाळू पाटील यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“महिंदळे गावातील विकासकामांबाबत पारदर्शक चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी एकमुखी भूमिका ग्रामस्थांनी यावेळी मांडली.

9,993Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION