💥 ब्रेकिंग : विद्यार्थ्याचे मृत्युप्रकरण : वैद्यकीय अहवालात मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : शहरातील आर. आर. विद्यालयामध्ये कल्पेश वाल्मीक इंगळे (१५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी त्याच्या वर्गमित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका यांनी दिशाभूल केली असून, त्यांच्याविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. कल्पेशच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्याचा मृत्यू, धक्कादायक वैद्यकीय अहवाल
आर. आर. विद्यालयामध्ये कल्पेश इंगळे या विद्यार्थ्याचा शुक्रवारी (११ जुलै) शाळेत मृत्यू झाला. त्याला अन्य मुलांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. तसेच शाळेच्या कारभाराविरुद्ध रोष व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच कल्पेशच्या वर्गशिक्षिका, चार ते पाच वर्गमित्र यांना पोलिसांनी बोलावून त्यांचे जबाब घेतले. तसेच याप्रकरणी मुलाचे वडील वाल्मीक भाऊराव इंगळे (४३) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी कल्पेशचा शाळेतील काही विद्यार्थ्यांसोबत वाद झाल्याची माहिती उघड झाली असून, त्यावरून कल्पेशच्या नातेवाईकांनी मारहाणीतून मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असून वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण डोक्याला मार लागला म्हणून झाल्याचे समोर आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यावरून पोलिसांनी वर्गमित्राला ताब्यात घेत बालन्यायमंडळासमोर हजर केले आहे. त्यानंतर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग : शाळेच्या मैदानावर नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; मारहाणीचा संशय, नातेवाईकांचा आरोप
💥 ब्रेकिंग : महिला बचत गटांसाठी ‘बहिणाई मार्ट’, पाचोऱ्यात भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन
जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराचा थरार : मनुदेवी फाट्याजवळ हॉटेल मालकावर गोळीबार




