🛑पाचोरा ब्रेकिंग: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना आली जाग, आज रस्ता रोको आंदोलन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीने अनुदान मिळावे या मागणीसाठी महाविकास आघाडी तर्फे आज, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जारगाव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत असल्याने, “विरोधकांना आता का जाग आली?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तरीही, आंदोलनाचे स्वरूप लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची घरे, जनावरे आणि विहिरीतही पाणी घुसल्यामुळे हानी झाली आहे. सरकारकडून काही प्रमाणात मदत जाहीर करण्यात आली असली तरी ती अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत –
• जाहीर करण्यात आलेले अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे
• कपाशी खरेदीसाठी सीसीआय केंद्र तातडीने सुरू करावे
• ज्यांच्या घरात पाणी घुसले, त्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले ₹१ लाख त्वरित द्यावे
• सोयाबीन व ज्वारीची शासकीय खरेदी लवकर सुरू करावी
• शेतकरी अनुदान घोटाळ्याची चौकशी करून ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांना तातडीने देय रक्कम द्यावी व दोषींवर कारवाई करावी
• खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी ₹५ लाख रोख स्वरूपात देण्यात यावे
• विहीरीतील गाळ काढण्यासाठी ₹२ लाख अनुदान मंजूर करावे
• दुधाळ जनावरांसाठी ₹१ लाख मदत द्यावी
या सर्व मागण्यांसाठी आजचे आंदोलन काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच महाविकास आघाडी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे अद्याप प्रलंबित असलेल्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, तसेच तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपला हक्क मागावा, असे आवाहन आयोजक पक्षांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 ब्रेकिंग: विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल, प्रशासनाचे दुर्लक्ष
🛑 ब्रेकिंग: राहुरी पोलीस पोलिसांचा अनोखा उपक्रम, वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष उपक्रम
🚨 राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावरून केली “ही” मागणी




