Sthal movie : सचिन पिळगांवकर आणि ‘स्थळ’ चित्रपटाची नवी इनिंग; महिला दिनानिमित्त प्रदर्शित होणार चित्रपट
हॅलो जनता न्युज, मुंबई
वैविध्यपूर्ण हिंदी आणि मराठी चित्रपट, दिग्दर्शन, गायन या सर्व क्षेत्रांत पाच दशकांपेक्षा अधिक काळ आपल्या बहुरंगी कारकिर्दीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात एक नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला ‘धुन प्रॉडक्शन’ निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ (Sthal movie) हा बहुचर्चित चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने, मार्च महिन्यात ‘स्थळ’ हा चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शित होईल.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘स्थळ’ चित्रपटाचे (Sthal movie) पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी केली आहे. चित्रपटात नव्या दमाचे कलाकार नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार यांच्या अभिनयाची छाप पडणार आहे.
दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांचे शॉर्ट फिल्म्स आणि ‘गिल्टी माईंड्स’ या गाजलेल्या वेब सीरिजच्या सहदिग्दर्शनानंतर ‘स्थळ’ हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर अत्यंत प्रतिष्ठेच्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाला आणि तिथेच त्याला NETPAC अवॉर्ड सुद्धा प्राप्त झाला. त्यानंतर, या चित्रपटाला २९ प्रमुख चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित केले गेले आहे आणि १६ पेक्षा जास्त पुरस्कार मिळवले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविषयी एक महत्त्वाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
सचिन पिळगांवकर म्हणाले, “चांगली संहिता रसिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून ‘स्थळ’ची प्रस्तुती केली”
“सर्वप्रथम श्रियाने मामी फेस्टिवलमध्ये हा चित्रपट पाहिला होता. खास श्रियाच्या आग्रहास्तव आम्ही अमेरिकेत ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘स्थळ’ चित्रपट पाहिला. त्यावेळीच हा चित्रपट आम्हाला प्रचंड आवडला. महाराष्ट्रातील मातीत रूजलेल्या या चित्रपटाला अमेरिकेतील मराठी लोकांनी डोक्यावर घेतलेलं पाहून, चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा, असे आम्ही निर्माता आणि दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना सांगितले होते.
‘स्थळ’ चित्रपटाचे (Sthal movie) निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मला चित्रपटाची प्रस्तुती करण्यासाठी विचारलं आणि मी लगेच होकार दिला. चांगली संहिता आणि उत्कृष्ट कथा रसिक प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहोचली पाहिजे, म्हणूनच मी या चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरवलं,” असे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.
Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे
Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक