हॅलो सामाजिक

प्रभाग ०९ मध्ये नगरसेवक ‘आरोग्य ढाल’ ; स्वखर्चातून राबवली मोफत फवारणी मोहीम.

हॅलो जनता प्रतिनिधी 

भडगाव : शहरात वाढत चाललेल्या डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्यावर संकट निर्माण होत असताना प्रभाग क्रमांक ०९ मध्ये लोकप्रतिनिधित्वाचा आदर्श पाहायला मिळाला. नगरसेवक विजयकुमार रायभान भोसले यांनी कोणत्याही शासकीय मदतीची प्रतीक्षा न करता स्वखर्चातून संपूर्ण प्रभागात मोफत फवारणी मोहीम राबवत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

सध्या शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः साचलेले पाणी, नाले परिसर आणि वाढलेली अस्वच्छता यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नगर परिषदेकडून शहरात फवारणीचे काम सुरू असले तरी संपूर्ण शहरात एकाचवेळी मोहीम राबवणे शक्य नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन नगरसेवक विजयकुमार भोसले यांनी तत्काळ पुढाकार घेत प्रभागातील प्रत्येक भागात औषध फवारणी सुरू केली.

प्रभागातील गल्लीबोळ, दाट लोकवस्तीचे परिसर, सार्वजनिक ठिकाणे, नाले परिसर तसेच रहिवासी भागांमध्ये विशेष यंत्रणेद्वारे फवारणी करण्यात आली. या मोहिमेमुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून “लोकप्रतिनिधी असा असावा” अशा प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत.

नगरसेवक विजयकुमार भोसले यांनी सांगितले की, “नागरिकांचे आरोग्य सर्वांत महत्त्वाचे आहे. प्रशासन आपले काम करत असले तरी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आम्ही स्वखर्चातून ही मोहीम हाती घेतली. भविष्यातही गरज पडल्यास अशाच प्रकारे जनहितासाठी काम सुरू राहील.”

ही जनहिताची मोहीम कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. आगामी काळात नगरपरिषदेमार्फत अधिक व्यापक स्तरावर फवारणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती ही यावेळी देण्यात आली. तसेच नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, प्रभागातील नागरिकांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत करत लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून जनतेच्या आरोग्याची जबाबदारी उचलल्याचे कौतुक केले. प्रभाग क्रमांक ०९ मधील ही मोहीम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button