पाळधी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या; प्रतापराव पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे जोरदार मागणी.

धरणगाव : तालुक्यातील पाळधी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भारतीय रेल्वे, भुसावळ विभाग यांना सविस्तर निवेदन सादर केले.
पाळधी हे धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. परिसरातील अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार तसेच उपचारासाठी प्रवास करणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. मात्र अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना पाळधी येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांना जळगाव किंवा भुसावळ येथे जाऊन प्रवास करावा लागत असून त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असल्याची खंत प्रतापराव पाटील यांनी व्यक्त केली.

विशेषतः शिक्षणासाठी बाहेरगावी जाणारे विद्यार्थी, कृषी व्यवहारासाठी प्रवास करणारे शेतकरी, व्यापारी तसेच उपचारासाठी जाणारे रुग्ण यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या आणि रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता काही महत्त्वाच्या गाड्यांना पाळधी येथे थांबा देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
या गाड्यांना थांबा देण्याची मागणी
🔸गाडी क्र. १२१११ – सूरत – अमरावती एक्सप्रेस
🔹गाडी क्र. १९००७ – सूरत – भुसावळ एक्सप्रेस
🔸खान्देश एक्सप्रेस (१९००३) – वांद्रा टर्मिनस – भुसावळ
प्रतापराव पाटील यांनी म्हटले आहे की, वरील गाड्यांना पाळधी रेल्वे स्टेशनवर अधिकृत थांबा मिळाल्यास हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असून विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल. तसेच रेल्वे स्थानकाचा विकास होऊन परिसरातील आर्थिक व व्यापारी प्रगतीलाही चालना मिळेल.
स्थानिक नागरिकांच्या रेल्वे प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने लोकहिताचा विचार करत पाळधी रेल्वे स्टेशनवर वरील गाड्यांना तातडीने अधिकृत थांबा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



