जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्मार्ट कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात संताप.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित स्मार्ट कंपनीकडून रुग्णालयातील स्वच्छता व इतर आवश्यक सेवा वेळेवर करण्यात येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागील तीन ते चार दिवसांपासून साई मल्टी सर्व्हिसेसचे काम बंद करण्यात आल्याने अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्था आणि महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. याचा थेट परिणाम उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच संबंधित कंपनीने सुशिक्षित युवकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळापासून सेवा बजावणाऱ्या अनेक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमी करण्यात आलेल्या कामगारांना तात्काळ कामावर पुन्हा घेण्यात यावे, अन्यथा मुलाबाळांसह अधिष्ठात्यांच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तीन मंत्रीपदे असतानाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्याप न्यूरोसर्जनची नियुक्ती नसल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. रुग्णालयात तातडीने न्यूरोसर्जनची नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत आणि माजी नगरसेवक सुनील माळी यांनी दिला आहे.




