दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरांना मोठी घसरण
हॅलो जनता प्रतिनिधी जळगाव : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतर अवघ्या १२ दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल २० हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ३५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, ही घसरण ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत असून बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची उत्सुकता वाढत आहे.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण कायम राहिली. गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात सुमारे एक हजार रुपयांची, तर चांदीच्या दरातही एक हजार रुपयांची घट झाली आहे. गेल्या ४८ तासांचा विचार केला तर सोन्याच्या दरात जवळपास ८ हजार रुपये, तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजार रुपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचा दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख २७ हजार २०० रुपये, तर चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो १ लाख ५८ हजार ६०० रुपये इतका आहे.
दिवाळीनंतर झालेल्या या मोठ्या घसरणीमुळे आगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः महिला ग्राहकांकडून दागिन्यांच्या खरेदीसाठी सुवर्ण बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. कमी झालेल्या दरांचा फायदा घेत लग्नसराईची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. मात्र, दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे सुवर्ण व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
