कु. लक्षिता पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सफाई कर्मचाऱ्यांसह रुग्णसेवकांना मोफत रेनकोट वाटप.

भडगाव : वाढदिवस हा केवळ केक कापण्याचा किंवा उत्सव साजरा करण्याचा दिवस न मानता समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि विधायक कार्य करण्याची संधी असावी, हा प्रेरणादायी संदेश देत शिवसेना-युवासेना व स्व. बापूजी युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कु. लक्षिता लखीचंद पाटील यांच्या वाढदिवस निमित्त शनिवार, दि. १८ जुलै रोजी भडगाव नगरपरिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांसह ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवक कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे.
हा उपक्रम स्व. बापूजी युवा फाउंडेशन जनसंपर्क कार्यालय, कोठली रोड, भडगाव येथे आयोजित करण्यात आला असून, पावसाळ्यात मुसळधार पाऊस, चिखल आणि प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कर्मयोग्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कु. लक्षिता या भडगाव नगर परिषदेचे गटनेते लखीचंद पाटील आणि नगरसेविका तथा महिला व बालविकास सभापती समीक्षा लखीचंद पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. यंदा सलग तिसऱ्या वर्षी हा सेवाभावी उपक्रम राबविला जात असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे.
स्वच्छता, आरोग्य आणि सार्वजनिक सेवांची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरेल अशी छोटीशी मदत करावी, या भावनेतून मोफत रेनकोट वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्य करण्याचा आदर्श या उपक्रमातून समाजासमोर ठेवण्यात येत आहे. “जे समाजासाठी प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभे राहतात, त्यांच्या सेवेला सलाम आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आमचे छोटेसे योगदान,” हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे आयोजकांनी नमूद केले.
समाजाभिमुख आणि सेवाभावी उपक्रमांची ही परंपरा इतरांनाही वाढदिवसासारखे वैयक्तिक आनंदाचे क्षण समाजहितासाठी उपयोगात आणण्याची प्रेरणा देणारी ठरत असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.



