हॅलो शिक्षणहॅलो डॉक्टर⁠हॅलो संवादहॅलो सामाजिक

वसतिगृहातील विद्यार्थ्याला वैद्यकीय मदतीस विलंब ; चौकशीची मागणी.

रक्ताच्या उलट्या होत असलेल्या विद्यार्थ्याला रुग्णवाहिका मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप ; २४ तास वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी.

जळगांव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी २४ तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी अशुतोषकुमार पाटील यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, २८ सप्टेंबर रोजी रात्री वसतिगृहातील एका विद्यार्थ्याची प्रकृती अचानक गंभीर झाली. संबंधित विद्यार्थ्याला रक्ताच्या उलट्या होत असल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, त्या वेळी रुग्णवाहिका चालक उपलब्ध नसल्याने वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परिस्थिती गंभीर झाल्याने विद्यार्थ्याला प्रथम वसतिगृहातील डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्याला शासकीय रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रुग्णवाहिका चालक कुठे होता?

घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित रुग्णवाहिका चालक त्या वेळी कुठे होता, त्याला अन्य कोणत्या कामासाठी पाठविण्यात आले होते का, तसे आदेश कोणी दिले आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास विलंब का झाला, याची माहिती घेऊन संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अचानक आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाने २४ तास रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय कर्मचारी किंवा डॉक्टर, स्वतंत्र आपत्कालीन संपर्क क्रमांक तसेच स्पष्ट वैद्यकीय आपत्कालीन प्रोटोकॉल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button