🛑 बिग ब्रेकिंग : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार, निवडणुका तीन टप्प्यांत?

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोग तीन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचा विचार करीत असून त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका, दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या गटरचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून विभागीय आयुक्तांना या रचनेला अंतिम मान्यता देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित विभागीय आयुक्तांनी कार्यवाही सुरू केली आहे. गट रचना पूर्ण झाल्यानंतर गट आरक्षण आणि मतदारसंघांचे आरक्षण निश्चित केले जाईल. त्यानंतरच पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची घोषणा होणार आहे.
🛑 महापालिका निवडणुका
राज्यात एकूण २९ महापालिका असून त्यात जालना आणि इचलकरंजी या नवनिर्मित महापालिकांचा समावेश आहे. सध्या सर्व २९ महापालिकांवर प्रशासक राजवट लागू आहे. त्यामुळे या महापालिकांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे.
🛑 नगरपरिषदा
राज्यातील नगरपरिषदा एकूण २४८ असून सर्व नगरपरिषदांची मुदत संपल्याने त्यांच्यावर प्रशासक राजवट आहे. यात नवनिर्मित नगरपरिषदांचाही समावेश आहे.
🛑 जिल्हा परिषदा
एकूण ३४ जिल्हा परिषदांपैकी सध्या ३२ वर प्रशासक राजवट आहे. केवळ दोन जिल्हा परिषदा कार्यरत आहेत.
🛑 नगरपंचायती
राज्यातील नगरपंचायतींची संख्या १४७ आहे. त्यापैकी ४२ नगरपंचायतींवर प्रशासक राजवट आहे. त्यामुळे नगरपरिषदा व नगरपंचायती मिळून २९० ठिकाणी प्रशासक राजवट सुरू आहे.
🛑 पंचायत समित्या
एकूण ३५१ पंचायत समित्यांपैकी तब्बल ३३६ समित्यांवर प्रशासक राजवट लागू आहे.
येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता…
राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या ताब्यात गेल्या असल्याने नागरिकांमध्ये लोकप्रतिनिधींकडून प्रतिनिधित्व मिळत नसल्याची नाराजी आहे. दरम्यान, आयोगाने टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाही प्रक्रिया पुन्हा रुळावर येणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तर येत्या महिनाभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी, शेतकऱ्यांना म्हणाले…
🛑पाचोरा नुकसान : अजूनही गावांमध्ये मदतकार्य सुरू, प्रचंड नुकसान अन् रडणारे चेहरे…




