हॅलो जनता न्यूज, पाचोरा – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी शिंदे सेना-भाजप आघाडीने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या आघाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया सोमवंशी यांचे नाव जोरदारपणे चर्चेत आहे.
महाविकास आघाडीने यावेळी पारंपरिक पद्धतीला छेद देत “जनतेतून उमेदवार निवड” हा उपक्रम सुरू केला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सोमवंशी हे गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक प्रभागात फिरून मतदारांशी संवाद साधत आहेत. नागरिकांना “कोण हवा उमेदवार?” असा थेट प्रश्न विचारून जनतेचे मत जाणून घेतले जात आहे. या उपक्रमाला स्थानिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सचिन सोमवंशी यांनी सांगितले की, “यावेळी जनतेच्या मनातील उमेदवार देऊन खरं लोकशाहीचं उदाहरण निर्माण करायचं आहे. जनतेला ‘काम हवे की दाम’ हा पर्याय विचारात घ्यावा लागेल.”
महाविकास आघाडीला यावेळी मनसे आणि प्रहार संघटनेचा पाठींबा मिळाल्याने पाचोऱ्यातील राजकीय समीकरणे अधिकच रोचक बनली आहेत. या तीन पक्षांच्या एकत्रित शक्तीने ‘वज्रमूठ’ तयार झाली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, जर महाविकास आघाडीने सुप्रिया सोमवंशी यांच्यावर विश्वास दाखवला, तर हा निवडणूक संघर्ष अधिक रंगतदार होईल आणि पाचोऱ्यातील राजकारणात नव्या समीकरणांची बीजे रोवली जातील. एकूणच, पाचोऱ्यातील महाविकास आघाडीची जनतेतील हालचाल, नव्या उमेदवार निवडीची पद्धत आणि सुप्रिया सोमवंशींचे नाव यामुळे स्थानिक राजकीय वातावरणात चांगलीच हलचल निर्माण झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग : भडगावमध्ये भाजपला मोठा धक्का! यांचा शिवसेनेत प्रवेश
