भडगाव गिरणा पूल वाहतुकीसाठी खुला पण, प्रशासनाच्या सूचना…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने सदर पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तरीही नागरिकांनी नदीकाठ परिसरात अनावश्यक वावर टाळावा, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
गिरणा प्रकल्पातून विसर्ग कमी मात्र सतर्कतेचा इशारा कायम..
पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होती. त्यानुसार आज सकाळी ७.३० वाजता प्रकल्पाचा विसर्ग ४४,५६८ क्युसेक्स वरून कमी करून ३७,१४० क्युसेक्स (१०५१.०६ क्युमेक्स) इतका करण्यात आला आहे. सध्या गिरणा प्रकल्पाचे वक्रद्वार क्रमांक १ ते ६ हे प्रत्येकी १५० सेंटीमीटरने उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नदीतील विसर्ग कमी झाला असून पुराची तीव्रता काहीशी ओसरली आहे.
गिरणा नदीला पूर, प्रशासनाचे आवाहन
सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाचे प्रमाण आणि प्रकल्पातील आवक पाहून विसर्गात फेरबदल केला जाणार आहे. आवक वाढल्यास विसर्ग पुन्हा वाढविण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी नदीकाठ परिसरात खबरदारी घ्यावी, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भडगाव व परिसरातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीकाठावर अनावश्यक गर्दी करू नये आणि हवामान विभाग व प्रशासनाकडून मिळणाऱ्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग: गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, भडगाव पुलावरील वाहतूक बंद….
💥जळगाव : फॉर्म हाऊसवर छापा, माजी महापौर ललित कोल्हे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात…
💥 ब्रेकिंग : चाळीसगावात हाहाकार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पूरपरिस्थितीची पाहणी