आषाढी एकादशी निमित्त भडगाव खालची पेठ ते हरेश्वर पिंपळगाव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन.

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील
या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी सर्वांनाच पंढरपूर जाणे शक्य नसल्याने प्रति पंढरपूर असलेले श्रीक्षेत्र हरेश्वर पिंपळगाव याठिकाणी पायी दिंडी सोहळा जाण्याचे आयोजन जय हरी माऊली भजनी मंडळ व ग्रामस्थ च्या वतीने करण्यात आले असून भक्ती, सेवा, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम. टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड घोषात आणि अभंगांच्या सुरेल स्वरांत दिंडी मार्गक्रमण करणार आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार असून, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”चा अखंड गजर वातावरणाला आध्यात्मिक ऊर्जा देणार आहे.
दिनांक 23 जुलै रोजी पहाटे अभिषेक पूजा व काकड आरती, पालखी पूजन त्यानंतर नगर प्रदक्षिणा, नित्यनेमानुसार संध्याकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन होणार असून तसेच दिंडीतील वारकऱ्यांसाठी आयोजकांनी सकाळचा नाश्ता, दुपारचे संतभोजन तसेच रात्रीच्या भोजनाची विशेष व्यवस्था केली आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि सेवाभावी व्यक्तींनी या उपक्रमासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्वयंसेवकांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, शिस्तबद्ध आणि सुरक्षित दिंडीसाठी नियोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळे आणि वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी, टाळकरी, माळकरी यासह महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पारंपरिक टाळ, मृदुंग, वीणा, भगवे ध्वज आणि हरिनामाच्या गजरात दिंडी हरेश्वर पिंपळगावकडे प्रस्थान करणार आहे. हा सोहळा केवळ धार्मिक नसून समाजात बंधुभाव, समता, व्यसनमुक्ती, स्वच्छता आणि सेवाभावाचा संदेश देणारा ठरणार आहे.
दिंडी सोहळ्याला विविध मान्यवरांचे सहकार्य लाभले असून, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. तसेच ह. भ. प. रमेश महाराज पवार टाकळीकर मार्गदर्शनाखाली व ह.भ.प. कुंदन महाराज पवार भडगावकर यांच्या अथक प्रयत्नाने ह.भ.प. स्वप्निल महाराज गिरडकर, ह.भ.प. धनश्री ताई शिंदे भडगावकर, ह.भ.प. विजय महाराज सावखेडेकर, ह.भ.प. लोकेश महाराज ढेकूकर, ह.भ.प. सचिन महाराज वरखेडकर, ह.भ.प. वैभव महाराज चाळीसगावकर, ह.भ.प. धर्मा महाराज चाळीसगावकर, ह.भ.प. शुभम महाराज टाकळीकर, ह.भ.प. संकेत महाराज भडगावकर, ह.भ.प. जयेश महाराज भडगावकर यांच्या सहकार्याने हा पहिलाच दिंडी सोहळा अधिक भव्य आणि संस्मरणीय करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
आयोजकांनी भडगाव शहर, पेठ परिसर तसेच पंचक्रोशीतील सर्व वारकरी, युवक, महिला आणि भाविकांना या ऐतिहासिक प्रथम पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विठ्ठल भक्तीची परंपरा अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाने हरिनामाचा गजर करत या दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“पायी चालताना प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या दिशेने, प्रत्येक श्वास हरिनामात आणि प्रत्येक वारकरी सेवाभावात” हा संदेश देत श्रीक्षेत्र भडगाव खालची पेठ ते श्रीक्षेत्र हरेश्वर पिंपळगाव प्रथमच निघणारा हा पायी दिंडी सोहळा परिसरातील वारकरी चळवळीच्या इतिहासात एक नवे पर्व ठरणार असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे.




