🛑ब्रेकिंग: कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी वाईट बातमी, कापसाच्या भावात ४.२६ टक्क्यांनी घसरण

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यभरातील कापसाच्या बाजारभावात गेल्या आठवड्यापासून घसरणीचा कल दिसून येत आहे. राजकोट बाजार समितीतील आकडेवारीनुसार, मागील आठवड्यात प्रती क्विंटल ७,२५१ रुपये एवढा असलेला कापसाचा सरासरी दर या आठवड्यात ४.२६ टक्क्यांनी घसरला असून, आता हा दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा खाली गेला आहे.
केंद सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत (MSP) ७,७१० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. मात्र सध्या बाजारात प्रत्यक्षात मिळणारे दर या हमीभावाखाली आले असून, शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा हवामान अनुकूल असून उत्पादन चांगले येईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दरही चांगले मिळतील, अशी आशा होती; मात्र सुरुवातीपासूनच भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
शेतकरी संघटनांनी सरकारकडे तातडीने कापसाची हमीदराने खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे. “शासनाने किमान आधारभूत किमतीवर तातडीने खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत, तर बाजारात भाव आणखी कोसळतील,” असा इशारा काही कृषी संघटनांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीतील घट, तसेच देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमधील पुरवठा वाढल्याने भावात ही घसरण झाली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सध्या उत्पादन खर्च वाढ, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारभावातील अस्थिरता अशा तिहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने एकत्रितपणे तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्य मागणी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑ब्रेकिंग: कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी वाईट बातमी, कापसाच्या भावात ४.२६ टक्क्यांनी घसरण
🛑ब्रेकिंग: शेतकऱ्यांना मोठा फटका, रब्बी हंगामापूर्वी भारतात युरियाचे दर वाढणार…




