🛑 ब्रेकिंग : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला : मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

हॅलो जनता न्यूज, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) – येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत झी २४ तास चे नाशिक जिल्ह्याचे ब्युरो चीफ योगेश खरे, पुढारीचे ब्युरो चीफ किरण ताजणे यांच्यासह इतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला चढवण्यात आला.
काल झालेल्या या हल्ल्यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात भेट देऊन ताजणे यांची विचारपूस केली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर हल्ला करणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे. अशा घटना कुठल्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.
या घटनेमुळे नाशिक पत्रकार जगतात संतापाची लाट उसळली असून पत्रकार संघटनांनीही हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यासाठी सखोल तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨जळगावात खळबळ : बेपत्ता तरुणाचा जीभ कापलेला मृतदेह मेहरूण तलावात आढळला




