💥 जळगाव ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्याच्या घरावर ईडीचा छापा, १३ तासांपेक्षा अधिक काळ तपासणी..

हॅलो जनता न्यूज, जळगाव : भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर, जळगाव तसेच फत्तेपूर येथील मालमत्तांवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तब्बल १३ तास चाललेल्या या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळी साडेसहाला सुरुवात झालेली तपासणी रात्री साडेसातपर्यंत चालली. या कालावधीत ईडीचे १० ते १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे शस्त्रधारी जवान तैनात होते. प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर येथील निवासस्थानासोबतच जळगाव व फत्तेपूर येथील विविध मालमत्तांवरही छापेमारी करण्यात आली.
जळगाव ईडी कारवाई : महत्वाची कागदपत्रे घेऊन पथक रवाना…
तपासणी दरम्यान लोढा यांच्या तसेच त्यांच्या पत्नी, मुलगा व सुनेच्या नावावरील मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे, दस्तऐवज व विविध गोष्टींची तपासणी करण्यात आली. रात्री उशिरा काही महत्वाचे दस्तऐवज जप्त करून ईडीचे पथक रवाना झाले.
प्रफुल्ल लोढा यांच्याविरुद्ध मुंबईत महिला अत्याचार व हनी ट्रॅप प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल असून सध्या ते कारागृहात आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या जिल्ह्यातील मालमत्तांवर ईडीने थेट छापेमारी सुरू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ईडीच्या या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होते, कोणते नवे खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥 ब्रेकिंग : खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अखेर जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं…



