ST Bus Stop: विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बस थांबा नावालाच; एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय!
रिकाम्या बसेसही थांबेनात; संतप्त विद्यार्थ्यांचा बस अडविण्याचा इशारा
हॅलो जनता प्रतिनिधी, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस थांबा(ST Bus Stop) उभारण्यात आला आहे. मात्र, जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक एसटी बसेस या थांब्यावर थांबत नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही एसटी महामंडळाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आता बस अडविण्याचा इशारा दिला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यासह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील विविध भागांतून विद्यार्थी येत असतात. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या बस थांब्यावरून (ST Bus Stop) पारोळा, एरंडोल, चाळीसगाव, धरणगाव यांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाण्यासाठी एसटी बसची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा थांबा तयार करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक बसेस येथे थांबत नसल्याने या सुविधेचा विद्यार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.
ST Bus Stop : हात दाखवूनही बसेस पुढे निघून जातात! विद्यार्थ्यांची गैरसोय
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा एसटी बसेसमध्ये जागा उपलब्ध असतानाही बसचालक विद्यार्थ्यांनी हात दाखवून बस थांबविण्याची विनंती केली तरी बसेस थांब्यावर न थांबता पुढे निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करावी लागते. विशेषतः सायंकाळच्या वेळी घरी परतताना विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. बस थांब्यावर बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून, त्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.
ST Bus Stop : पास काढूनही खासगी वाहनांचा आधार घेणे शक्य नाही
विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी एसटीचे प्रवासी पास काढलेले आहेत. त्यामुळे त्यांना नियमित प्रवासासाठी एसटी बसवर अवलंबून राहावे लागते. खासगी वाहनाने प्रवास करणे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. अशा परिस्थितीत एसटी बस थांब्यावर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवासाचा प्रश्न निर्माण होत आहे. पास काढूनही वेळेवर बस मिळत नसेल, तर या सुविधेचा उपयोग काय, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.
ST Bus Stop : एसटी महामंडळाने तातडीने दखल घेण्याची मागणी
या समस्येबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार माहिती देऊनही जळगाव एसटी महामंडळाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास बस अडविण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बस थांब्यावर संबंधित मार्गांवरील एसटी बसेस थांबविण्याच्या स्पष्ट सूचना विभाग नियंत्रकांनी चालकांना द्याव्यात. तसेच, बसमध्ये जागा उपलब्ध असतानाही या थांब्यावर बस न थांबविणाऱ्या चालकांच्या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक वेळ, आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षित प्रवास लक्षात घेता एसटी महामंडळाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आता विभाग नियंत्रक या तक्रारीची दखल घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देतात का, याकडे विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग : भडगाव वाळू माफिया कारवाई : महसूल विभागाची व्हॉटअप वर प्रेस नोट, कारवाई संदर्भात संभ्रम…
पाचोरा महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, सत्ताधारी आमदारावर गंभीर आरोप…




