⁠हॅलो क्राईम

फायनान्स कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांने रचला लुटीचा कट ; भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा पर्दाफाश.

जळगाव/ भडगाव : भारत फायनान्स कंपनीतून जमा झालेली ५१ हजार ५६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात फायनान्स कंपनीत काम केलेल्या माजी कर्मचाऱ्यानेच साथीदारांच्या मदतीने लुटीचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. दोन संशयित आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.यश हिरामण हटकर (रा. शिवनेरी गेट, भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१० रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यात अज्ञात आरोपींनी ५१ हजार ५६० रुपये असलेली बॅग हिसकावून नेल्याचे नमूद करण्यात आले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांनी उदय छोटू गायकवाड (२२, रा. अनकवाडी, ता. जि. धुळे) याला ताब्यात घेतले.

उदय हा यापूर्वी भडगाव येथील भारत फायनान्स कंपनीत कामाला होता. त्यामुळे कंपनीतून दररोज जमा होणारी रोकड कोण घेऊन जातो, किती वाजता घेऊन जातो, याची त्याला माहिती होती. पोलिस चौकशीत उदयने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानुसार अनिल दिलीप पाटील (३१, रा. पळासखेडा), विशाल मधुकर गांगुर्डे (२६, रा. पूर्वीपाडा, धुळे), निलेश अण्णा पवार (२०, रा. अनकवाडी), योगेश प्रकाशपवार (२२, रा. अनकवाडी) यांना अटक करण्यात आली.

९ जुलै रोजी सायंकाळी आरोपी वेगवेगळ्या मोटारसायकलींवरून भडगाव येथे आले होते. पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेवून त्याची बॅग हिसकावण्याचा कट त्यांनी रचला. यातील काही आरोपी एका मोटार सायकलवरून तिघे जण गेले, तर अन्य आरोपी दुसऱ्या मोटारसायकलवरून त्यांच्या पुढे-मागे राहून पाळत ठेवत होते.

आरोपी उदय हा इतर साथीदारांशी वेळोवेळी संपर्क साधत होता. गुन्हा केल्यानंतर सर्व आरोपी आपापल्या घरी निघून गेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.

आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीची एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील सागर हिम्मत पाटील (रा. पळासखेडा) आणि हर्षल चांगदेव अहिरे (रा. येवला) हे दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button