हॅलो जनता न्यूज, रावेर – पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या निर्णयाचा प्रभाव परिसरातील इतर भागांवरही दिसू लागला असून, आता सावदा शहरातही शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.
सावदा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन, तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुका व शहर प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना : समाधानकारक जागा वाटप न झाल्यास स्वबळावर..
बैठकीत महायुतीत जागा वाटप आणि निवडणूक तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, महायुतीत समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत, तर शिंदे गटाची शिवसेना सावदा नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढेल, असे स्पष्ट विधान जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी यावेळी केले.
महाजन यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा पूर्ण विश्वास आहे. जनतेशी थेट संवाद साधत आम्ही विकासाभिमुख अजेंडा घेऊन मैदानात उतरू. शिवसेनेचा झेंडा सावद्यात नक्की फडकणार.”
या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन बांधणी, प्रचार धोरण आणि स्थानिक पातळीवरील आघाड्यांवरही विचारविनिमय झाला. बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असून, सावद्यात शिवसेना शिंदे गट स्वबळावर उतरल्यास निवडणुकीला वेगळे राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
पाचोरा ब्रेकिंग : पाचोऱ्यात उद्या श्री. बालाजी महाराज रथयात्रा, रथोत्सवाची १९० वर्षाची परंपरा
पाचोरा ब्रेकिंग : पाचोऱ्याच्या नगरध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर, यांना मिळणार उमेदवारी…
