गौरी किशोर उशिर यांना दहावीत ९४.६० टक्क्यांनी नेत्रदीपक यश ; विविध संस्थांकडून गुणगौरव सोहळा.
नेरी ता. जामनेर : नेरी केंद्र शिक्षण प्रसारक को-ऑप. मंडळ लि. संचलित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नेरी येथील गुणवंत विद्यार्थिनी गौरी किशोर उशिर हिने मार्च २०२६ मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
गौरीने दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विशेषतः गणित विषयात प्रथम क्रमांक मिळवला. नियमित अभ्यास, सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर तिने हे यश मिळविले. तिच्या या यशामुळे पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच शैक्षणिक क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गौरीच्या गुणवत्तेची दखल घेत विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांसह मान्यवरांनी तिचा सत्कार करून गौरव केला. (गणित विषयात प्रथम) आल्याबद्दल शिवलाल नथ्थु सोनवणे, (दहावीत प्रथम) आल्याबद्दल प्रियंका कलेक्शनचे संचालक सुनिल अशोक पाटील, भगवान एकनाथ इधाटे, डॉ.एल. यु. जैन, दिलीप पंडित पाटील, कैलास काशिराम पाटील, अरुण चिंधुजी पाटील, डी. सी. पाटील सर, अनिल पांडुरंग खोडपे यांचेकडून बक्षीस तसेच इतर मान्यवरांच्या वतीने गौरीला बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरवामुळे तिच्या यशाला आणखी मोठी प्रेरणा मिळाली आहे.
गौरीच्या यशामागे तिचे आई-वडील व कुटुंबीयांचे प्रोत्साहन, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि स्वतःची अथक मेहनत यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगण्यात आले. शाळेतील शिक्षकवृंदानेही तिच्या यशाचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवून गौरीने आपल्या गुणवत्तेची चमक दाखवून दिली असून, तिच्या या यशामुळे नेरी गावाच्या शैक्षणिक क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गौरीने भविष्यातही अशाच प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कुटुंबासह शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



