रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर : केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

रावेर, ता. ३० जून — रावेर तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासोबत हलक्या प्रमाणात पावसानेही हजेरी लावली. मात्र, वाऱ्याच्या तीव्रतेमुळे अनेक शेतांतील केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील वर्डी, अभोडे, सावदा, निंभोरा, ऊमळदा, कासोदा, उंबरखेड, आंधळे बुद्रुक या परिसरात वाऱ्याचा जोर अधिक होता. अनेक शेतांतील केळीच्या बागा आडव्या झाल्या असून, अनेक ठिकाणी काढणीसाठी सज्ज असलेली केळी पिके वाया गेली आहेत. परिणामी, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
स्थानिक शेतकऱ्यांना सांगितले की, “सध्या केळीला बाजारात चांगला दर मिळत असतानाच वादळामुळे मोठ्या प्रमाणावर पीक उध्वस्त झाले. हे नुकसान भरून काढणे कठीण आहे.” तहसील प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे.
रावेर तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रात केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे या भागातील शेतकऱ्यांना वारंवार नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥ब्रेकिंग : आरोग्य विभागाचे सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड, जिल्हयात वर्षभरात ७५८ बालविवाह
भडगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा संपन्न, आमदार किशोर पाटलांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान