जळगाव विधानपरिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांना भाजपची उमेदवारी.
जळगाव : विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असताना अखेर नंदकिशोर महाजन यांनी बाजी मारली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय वर्तुळात अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी नंदकिशोर महाजन यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक नेते मैदानात होते. उद्योग, सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रातील अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. विशेषतः उद्योजक नंदू अडवाणी, अमोल शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र फडके, डॉ. केतकीताई पाटील तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या नावांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.
दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांकडूनही या जागेसाठी हालचाली सुरू होत्या. शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे नावही आघाडीवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे उमेदवारीची शर्यत चुरशीची बनली होती.
मात्र सर्व राजकीय गणितांना छेद देत भाजपने नंदकिशोर महाजन यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले. पक्षाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून आगामी निवडणुकीत भाजपची रणनीती काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नंदकिशोर महाजन हे लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय रंगत आणखी वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.



